दिनांक: 16/08/2025
लातूर (प्रतिनिधी) लातूर तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह लातूर पोलिसांनी सतर्कता दाखवत मुला-मुलीच्या आई वडिलांचे प्रबोधन करुन रोखला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वर फोन करून एका नागरिकांने लातूर तालुक्यातील 12 नंबर परिसरात बालविवाह होणार असल्यासंदर्भात माहिती लातूर पोलिसांना दिली. त्यावरून डायल 112 येथील कार्यरत पोलीस अधिकारी/अमलदारांनी तत्परतेने कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची माहिती दामिनी व भरोसा सेल च्या पथकाला दिली. त्यावरून भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व त्यांच्या पथकाने वेळेत सदर ठिकाणी पोहोचून होणारा बालविवाह थांबविला तसेच बालविवाह लावणाऱ्या पालकांना नोटीसा देऊन बालकल्याण समिती समोर हजर राहणे संदर्भात समज दिली आहे.
सजग नागरिकांने डायल 112 वर दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांच्या भरोसा सेल व दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, डायल 112 युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले, पोलीस अंमलदार, नितीन कोतवाड, चिंतामणी पाचपुते,चित्रा कुंभार, शंकर बुड्डे, चालक पल्लवी चिलगर तसेच सोबत चाइल्ड लाइन चे बापू सूर्यवंशी यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करून वेळीच बालविवाह रोखला आहे.
0 Comments